Tuesday, July 15, 2014

तोच खरा...

नको बांधूस वारा इतक्यात भिंती घालून,
होउ दे पराग स्वार तुझा त्या मरुवर,
जाऊ दे क्षितिजापल्याड त्याला तुझा अंश घेऊन,
कळू दे जगालाही ,
लाज सौंदर्याचीही असते इथे एका जातीला!

नको घालूस एवढ्या प्रदक्षिणा, दगडच शेवटी,
माझ्यासारखाच…तोही!
क्षुद्र, पायांना तुझ्या क्षुद्र अशा नेणिवाच आहेत.
ओझी मनातल्या वेदनांची का सोसावी कुणी?
जळू दे स्वप्नांना अशा,
झिजून दगडाची तुझ्या 'त्या' शेवटी मातीच होणार आहे…!!

नको मांडूस शब्दांत, चुकवून एक स्पंदन तुझ्या हृदयाचे,
जपून ठेव… विश्वासाने!
उतरू दे रक्तात सगळं, पुन्हा नव्या आश्चर्यासाठी,
लपू दे तिथेच त्याला… दारामागे, फडताळावर अगदी कुठेकुठेही…
सांभाळू नकोच पण अडवुही नको!
मग केव्हातरी एखाद्याला उमजेल… तोच खरा…
फक्त तुझ्याचसाठी धाडलेला!!!


राहुल कावरे,
अमरावती

Friday, May 2, 2014

वाचून बघा...! झेपली तर चांगलंच आहे...(माझ्यादृष्टीनं!)

या ब्लॉग वर एक संकेत मी आजवर पाळत आलेलो आहे तो म्हणजे 'सोप्या-सुटसुटीत कविताच इथे पोस्ट करणे'. जेणेकरून कुणाही वाचकाला अन्वयार्थ समजावून सांगण्याच्या भानगडीपासून सुटका होईल.
पण खूप दिवसांपासून ब्लॉगवर काहीही पोस्ट केलेलं नव्हतं आणि गेल्या काही काळापासून बोली भाषेतल्या कविता जुळून येत नव्हत्या. आता तर ब्लॉगची गरज म्हणून पोस्ट करणं आलं आहे म्हणून त्यातल्या त्यात सोप्पी अशी ही कविता निवडली आहे.
नाही कळली तरी काळजी करू नका, सोप्या कविताही जमतील पण त्याला वेळ द्यायला हवा आहे…तोपर्यंत धीर धरायला हवा आहे… तुम्ही आणि मीसुद्धा !


विसावा !

नाही अनुभवायचं, या दुराव्यातून आता काही
सुखापासून दुःखापर्यंत तसाच चाललोय मी !

वाहू दे जखमांतून रक्त भळभळत तसेच,
वाटा काट्यांच्या मुद्दाम तुडवत आलोय मी !

एकांतातला स्वर्ग जरी अनुभवला नाही कधी ,
परकेपणातल्या यातना पुरत्या अनुभवल्यात मी !

इभ्रतीच्या चामडीची लक्तरे जरी उधळली,
वर पाण्यासाठी मिठाच्या,आग्रह धरलाय मी !

काटेरी पायवाटेत त्या भिजलेल्या,प्रेमाच्या रक्ताने,
छिन्नभिन्न अवशेषही मनाचे,पाहिले होतेच मी !

सत्य अशा स्वप्नांच्या शोधात निघालो पुढे…
आशेवर एकाच,
दुःखाच्या मुक्कामानंतरच प्रेमाचं कुरण असतं…
तिथेच विसावेन मी !!!


                                          - राहुल राजेंद्र कावरे,
                                          अमरावती

Sunday, July 21, 2013

आई !

या कवितेची मध्यवर्ती कल्पना मला जळगाव - अमरावती प्रवासा दरम्यान एका हिंदी कवितेवरून सुचली.  
ती कागदावर न उतरवता मी रेल्वेच्या बाकावर लिहून ठेवली होती , दुसर्या दिवशी जाऊन तो बाक शोधणं आणि सगळ्यांसमोर ती एका कागदावर लिहून घेणं हा किती हास्यास्पद अनुभव असेल याची तुम्ही  कल्पना करु शकता…आणि म्हणूनच ही कविता माझ्यासाठी अविस्मरणीय आहे !


कलीच्या दुकानात त्याने एकदा विकायला ठेवले होते नाते …
प्रत्येकालाच मग तिथे उघडायला हवे होते खाते !

पैसे टाकून बाप-बहिण-भावासारखी मिळत होती नाती …
आजी आजोबा, काका मामा यांनीही भरली होती पोती !

बायकोला माझ्या मग जावसं वाटलं त्या दुकानात … 
होता तिचाही विश्वास या विकतच्या नात्यांत !

गेल्याबरोबर आत मला म्हणाला दुकानदार,
"काय हवंय भाऊसाहेब ? नाती सगळीच मिळतात… 
मुलगा देऊ का मुलगी ??
आहेत आमच्याकडे जावई अन सूनही… 

सुचेना मला बोलावं काय … 
कलीच्या या गुलामाला आता मागवं तरी काय???

बायको आता गुंतली होती भावाच्या तोलामोलात .  
हळूच मग मी म्हणालो दुकानदाराच्या कानात …
"राजा मला हवीये रे आई … "
डोळ्यात पाणी आणून तो मला म्हणाला,
"माफ करा दादा, हे नातं विकायला नाही… 
किंमत सांगेल त्याची असा कुणी अजून तरी मला भेटलेला नाही …"

म्हणालो त्याला,"जाऊ दे राजा, मीच वेडा…
कळलंय मला पैशानं विकत मिळत नसतं सर्वकाही… 
आणि तसंही,
भावनाहीन जगात आज या, हवीय कुणाला रे आई ???"

-राहुल राजेंद्र कावरे, 
  अमरावती 




Wednesday, July 3, 2013

पटत नसेल तर खाली उदाहरण पहा…

चार ओळींच्या कविता,
फार सोप्या असतात…
फक्त यमक जोडले की,
त्या खरंच कविता वाटतात !!

- राहुल राजेंद्र कावरे
  अमरावती

का कुणास ठाऊक ??

स्वप्नांत माझ्या तू नेमकी येतेस.
प्रयत्न करतोय तुला विसरण्याचा …
पण सगळं विसराल्यावरही,
तूच तेवढी आठवतेस …

- राहुल राजेंद्र कावरे
  अमरावती 

सुनी कहाणी…

आज नाहीस तू आयुष्यात माझ्या
मी तरी जगतोच आहे…
वाचायला नसली तू जरी
मी अजून लिहितोच आहे…

- राहुल राजेंद्र कावरे
  अमरावती 

Thursday, June 27, 2013

Random Thoughts...

देवानं माणसाला भूलोकात पाठविण्याआधी त्याच्याजवळ वरदान म्हणून एक रंगांचं भांडार दिलेलं असतं, शापासकट !
होय, वाढत्या वयाबरोबर त्यातील रंग कमी होत जाण्याच्या शापासकट !
बालवयात म्हणूनच माणूस बहुरंगी असतो. त्याला चित्रकार म्हणून त्याची कलाकृती हवी तशी सजवायची मुभा असते अगदी कुणा कुणाच्या लुडबुडीशिवाय… स्वतंत्रपणे !
तारुण्यात त्याच्यात एका चित्रकाराची प्रगल्भता येते. पण कुंचला मात्र सप्तरंगात आकुंचाला असतो, सोबतच चित्रात लुडबुड करणारे हातही वाढतात.
एकदा बालपणातली दुसर्यांची लुडबुड समर्थनिय व स्विकारार्ह्य असेलही मात्र तारुण्यात ती स्विकारून चालत नाही अन म्हणूनच कुंचल्यामागचा हातही तेवढाच मजबूत असावा लागतो.
आणि एकदा का ती कलाकृती पूर्ण झाली की येणाऱ्या एकरंगी वार्धक्यात त्या चित्राकडे पाहून त्याच्या सीमा गडद करण्यापलीकडे दुसरा कुठलाही आनंद असू शकत नाही.
मात्र जर कलाकृती अपूर्ण राहिली की सारखं, नकळत त्या बेरंगी भागाकडे लक्षं जातं…
मग पश्चाताप होतो,
चित्रकार असल्याचा…
रंग संपल्याचा….!


- राहुल राजेंद्र कावरे
  अमरावती